कडकनाथ घोटाळ्याबाबत मोठी बातमी! कंपनीच्या संचालकाला अटक, शेतकऱ्यांचे बुडालेले पैसे मिळणार का?

काही दिवसांपूर्वी राज्यात कडकनाथ घोटाळा चांगलाच गाजला होता. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अनेकांनी यामध्ये लाखो रुपये गुंतवले होते. कडकनाथ जातीच्या कोंबड्यांचे पालन आणि नंतर ते खरेदी करण्याच्या नावावर तब्बल 1.65 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार काही वर्षांपूर्वी उघडकीस आला होता.

यामुळे यामध्ये ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. आता यामध्ये महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीचा संचालक सुधीर मोहिते याला अटक केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचे पैसे मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता त्याला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

राज्यभरात या कंपनीने 1500 हून अधिक शेतकर्‍यांना 500 कोटींहून अधिक रूपयांचा चुना लावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्याचे सांगितले गेले. दरम्यान, कडकनाथ प्रजातीच्या काळ्या रंगाच्या कोंबडीच्या चिकनला मध्य भारतात मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठी मागणी आहे.

900 रुपये प्रति किलो असा चिकनच्या विक्रीचा दावा केला जात होता. यातून मोठे उत्पन्न मिळवून देण्याच्या आमिषाने शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात आली. मात्र, गुंतवणूकदार शेतकर्‍यांकडून घेतलेले पैसेही परत दिले नाहीत. नवीनच आलेली ही जात अल्पावधीत फेमस झाली, आणि शेतकऱ्यांना यातून चांगले पैसे मिळतील असे सांगितले गेले.

यामुळे यामध्ये शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले. आरोपींनी पैसे घेऊन व्यवसाय न सुरू करता फसवणूक केली. शेतकऱ्यांना पुढे काहीच मिळाले नाही, यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार दिली होती, अनेक तक्रारी याबाबत आल्यानंतर हा एक मोठा घोटाळा असल्याचे दिसले. पुणे, पालघर, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकमध्येही कंपनीने जाळे पसरवून अनेक शेतकर्‍यांची फसवणूक केली.

Leave a Comment