Shetkari :- सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. यामुळे ऊसदर किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना शासन निर्णयानुसार साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर करणे बंधनकारक आहे.
कऱ्हाड तालुक्यातील रयत अथणी वगळता इतर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही. कारखाने सुरू होऊन 15 दिवस झाले मात्र निर्णय झाला नाही, यामुळे या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
यामुळे रयत क्रांती संघटनेच्या वतीने ऊस दर जाहीर न करून शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच कारवाई झाली नाही तर न्यायालयामध्ये फसवणूक झाली, अशी याचिका दाखल करणार आहोत. असे निवेदनात म्हटले आहे.
याबाबत येत्या तीन दिवसांत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी साखर आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामुळे आयुक्त काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.
दरम्यान, राज्यात उस दरावरून राजकीय वातावरण तापले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी देखील आंदोलन करत आहेत. यासाठी ते 25 तारखेला चक्का जाम आंदोलन देखील करणार आहेत.