गेल्या आठवड्यात पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली होती. परिणामी अनेक जिल्ह्यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. तर काही शहरात पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. आता पाऊस उघडेल अशी आशा असतानाच हवामान विभागाने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 5 दिवसात तीव्र स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे. काय आहे इशारा?येत्या 5 दिवसांत महाराष्ट्रात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 2-3 दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळाची शक्यता देखील विभागाने वर्तवली आहे.
दिवाळी काही दिवसांवर आल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. मात्र, पावसामुळे त्यात व्यत्यय येताना दिसत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची दिवाळी या पावसाने कडू झाल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्या सोयबिनसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्येही मंगळवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने राज्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पुणे आणि मुंबईतही अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. दरम्यान उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मान्सूनने परतीचा प्रवास केला आहे. याचबरोबर राज्यातील काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. पुढील 1-2 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांतून मान्सून माघारची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.