मोठी बातमी : 2 दिवसांपासून मोदींना ठार मारण्याच्या धमक्या

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कंट्रोल रुमच्या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माणसं मोदींची हत्या करतील असे मेसेज पाठवण्यात आले आहे.आज सकाळी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कंट्रोल रूमच्या क्रमांकावर अनेक व्हॉटसअप मेसेज आले. मागील दोन दिवसांपासून हे मेसेज पाठवले जात आहे. यात आतापर्यंत 19 ऑडिओ क्लिप आणि 20 मेसेज पाठवले आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.

या मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे ठार मारण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली. याबद्दल तातडीने वाहतूक शाखेनं वरिष्ठ पोलिसांना याबद्दल माहिती दिली. वरळी पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असून मेसेज कुणी पाठवला, याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसच्या ट्रॅफिक कंट्रोल मोबाईल क्रमांकावर हा धमकीचा मेसेज आला. यावेळी कंट्रोल नंबरवर अनेक ऑडिओ क्लिपसही आल्या आहेत. त्यापैकी एका क्लिपमध्ये मोदींना ठार मारण्याचा दावा केला आहे.

“अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे गुंड देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार आहेत” आणि देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं या ऑडीओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.

20 नोव्हेंबर रोजी ट्रॅफिक कंट्रोलच्या क्रमांकावर 7 ऑडिओ क्लिप आणि 11 मेसेज प्राप्त झाल्याची माहिती आहे. आणि 21 तारखेला 12 ऑडिओ आणि 9 मेसेजेस प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

या व्यक्तीपर्यंत पोलीस पोहोचले आहे. तपासात आढळून आले की, मेसेज करणारा व्यक्ती पूर्वी एका डायमंड कंपनीत दागिने घडवणारा कारागीर होता. परंतु मानसिक आजारामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्यानं तो एक वर्षांपासून बेरोजगार आहे. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. ही व्यक्त केरळमध्ये असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Leave a Comment