17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार राजू शेट्टी यांची घोषणा

सध्या राज्यात उस दराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी  आक्रमक झाले आहेत. यासाठी ते राज्यात ऊस परिषदेचे आयोजन करत आहेत. तसेच यामध्ये ते कारखानदारांवर टीका करत आहेत. आता राहुरी येथील परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी यांनी विविध मागण्या केल्या आहेत. तसेच त्यांनी कारखानदारांवर गंभीर आरोप केले आहेत.

ते म्हणाले, साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात. राज्यातील साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन केले जावेत, सर्व साखर कारखान्याच्या काट्यांवर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे. यासंदर्भात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येत्या 7 तारखेला पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढणार आहे.

मागच्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपी पेक्षा दोनशे रूपये जास्त दर साखर कारखानदारांनी दिले पाहिजेत. तसेच यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देत हंगाम संपल्यानंतर 350 रूपये द्यावेत अशी मागणी राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.

तसेच सरकारने याकडे लक्ष दिले नाही तर 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. दरम्यान, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह आता राजू शेट्टी यांनी अहमदनगरमध्येही ऊस परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत शेतकऱ्यांच्या मालाल भाव मिळवून देण्याची मागणी केली. राहुरी तालुक्याच्या टाकळीमिया येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परीषद संपन्न झाली. यावेळी शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारसह विरोधकांवरही निशाणा साधला आहे. यामुळे येणाऱ्या काळात हा प्रश्न अजूनच पेटण्याची शक्यता आहे. सध्या शेतीची खते आणि इतर गोष्टी महाग झाल्या आहेत. यामुळे शेती करणे अवघड झाले आहे.

Leave a Comment